माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी केले जप्त
गडचिरोलीत माओवाद संपुष्टात आल्यानंतर आता जिल्ह्यात सुरक्षित वातावरण निर्मितीवर पोलीस दलाचा भर आहे. याचाच एक भाग म्हणून माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले आहे.
4 नोव्हेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोस्टे गॅरापत्ती हद्दीतील टव्वे जंगल परिसरात माओवाद्यांनी स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता येथील 4 तुकड्या, तसेच बीडीडीएसचे 2 पथक शोध अभियानासाठी रवाना करण्यात आले. कसून तपासणी केल्यानंतर घटनास्थळावरून 11 कुकर, 3 बंडल कॉर्टेक्स वायर, 3 किलो गन पावडर, 4 डेटोनेटर, 12 व्हॅटची बॅटरी, 250 ग्रॅम फटाका बारूद, 4 स्टील कंटेनर, 8 वायर बंडल, 1 सोलर प्लेट आणि इतर माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज, हर्षवर्धन बि. जे., पोलीस उप-अधीक्षक सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.








