Monday, November 9, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीगडचिरोलीत ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी

गडचिरोलीत ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी

गडचिरोलीत ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी

 

*गडचिरोली (संपादक – गणेश शिंगाडे) -*

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली.

 

मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला आहे. जिल्हा माओवादमुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता व विकासाला चालना देण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवाळी सणाचे औचित्य साधून जिल्ह्यातील एकूण ७० पोस्टे / उपपोस्टे / पोमकें येथील नागरिकांसोबत तसेच नवजीवन वसाहत गडचिरोली येथील आत्मसमर्पित सदस्यांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात आली.

 

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथे जाऊन नागरिक व जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी पोमकें गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उप पोस्टे पेंढरी, तर अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी उपपोस्टे जिमलगट्टा येथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली.

 

सर्व उपविभागांतर्गत येणाऱ्या ७० पोस्टे / उपपोस्टे / पोमकें येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत दुर्गम भागातील नागरिकांना मिठाई व फटाके वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.

 

माओवादाच्या हिंसक विचारसरणीचा त्याग करून शांततेचा आणि विकासाचा मार्ग स्वीकारलेल्या आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, त्यांच्यामध्ये विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत मिठाई, फटाके वाटप करून फराळाचा आस्वाद घेण्यात आला.

 

यासोबतच गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट कृषी समृद्धी तसेच सेवा मित्र मंडळ व आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना दिवाळीनिमित्त अन्नधान्य व फराळाचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले, माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत केवळ सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक सलोखा, लोकसहभाग, विश्वास आणि विकास यांनाही तितकेच महत्त्व आहे. पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित व विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

 

सदर उपक्रम पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे / उपपोस्टे / पोमकें व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राबविला.

ताज्या घडामोडी
आजच्या ताज्या बातम्या
- Advertisment -spot_img

लोकप्रिय बातम्या