आजाराने ग्रस्त महिलेच्या कुटुंबाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची आर्थिक मदत.
महागाव येथील कोंकावार कुटुंबाला संकटाच्या काळात दिला आधार; सामाजिक बांधिलकीचे दर्शन.
अहेरी प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील महागाव येथील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेला मदतीचा हात देत माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कोंकावार कुटुंबाला आर्थिक मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
महागाव येथील रहिवासी सौ. रामक्का बानय्या कोंकावार या गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार केले; मात्र आजार चौथ्या टप्प्यात पोहोचल्याने त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुन्हा स्वगृही महागाव येथे आणण्यात आले असून सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. या परिस्थितीमुळे कोंकावार कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
दरम्यान, महागाव बुजचे राजेंचे कट्टर समर्थक तथा माजी उपसरपंच संजय अलोने यांनी कोंकावार कुटुंबाची बिकट परिस्थिती फोनद्वारे राजे अम्ब्रिशराव महाराज यांना सांगितली. या माहितीची तत्काळ दखल घेत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देऊन माणुसकी जपली.
गरजू आणि अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राजे अम्ब्रिशराव महाराज नेहमीच पुढाकार घेत असतात. कोणत्याही संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शक्य ती मदत करण्याची त्यांची भूमिका या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.








