*बबलू भैया हकीम आणि शाहीन भाभी हकीम यांनी शाल-श्रीफळ देऊन श्वेताचा गौरव केला. तसेच तिच्या भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा*
आष्टी प्रतिनिधी
आष्टी पासून जवळ असलेल्या कढोली या गावातील कु. श्वेता मंजुषा भास्कर कोवे हिने मोठी झेप घेत भारतीय संघात स्थान मिळवत दुबई येथे होणाऱ्या एशियन युथ पॅरा गेम्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील बी.ए. प्रथम वर्षाची ही विद्यार्थिनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारातून भारताचे प्रतिनिधित्व करणार असून गडचिरोली जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
दिव्यांग असूनही श्वेताचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. आठवीपासून ती एका हाताने सायकल चालवत आपल्या भावासह दररोज सात किलोमीटर अंतर पार करत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, आष्टी येथे जात असे. तिच्या चिकाटीची दखल घेऊन प्रशिक्षक डॉ. श्याम कोरडे यांनी तिच्यातील सामर्थ्य ओळखले आणि तिला तिरंदाजी खेळासाठी मार्गदर्शन सुरू केले. सातत्यपूर्ण मेहनत व जिद्दीच्या जोरावर श्वेताने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदके पटकावली.
एशियन युथ पॅरा गेम्ससाठी तिची झालेली निवड जाहीर झाल्यानंतर वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव अब्दुल जमीर अब्दुल हकीम, विभागीय अध्यक्षा शाहीन ताई हकीम, प्रा. सर्फराज आलम यांनी शाल-श्रीफळ देऊन श्वेताचा गौरव केला. तसेच तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत “भारतासाठी नक्कीच पदक घेऊन येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
श्वेताच्या यशात महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाचभाई, सुशील अवसरमोल आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. एका हाताने दिव्यांग असलेल्या खेळाडूला सर्वोच्च पातळीवर पोहोचविण्याचे श्रेय प्रशिक्षक डॉ. श्याम कोरडे यांना जाते, तर कठीण परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या श्वेताच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


